छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

राजा शंभूछत्रपती

१९८७ सालच्या नोव्हेंबरमधील गोष्ट. अहमदनगरला सूर्यपुत्र कर्णावरील त्रिदिवसीय व्याख्यानमालेसाठी गेलो होतो. फावल्या वेळात अहमदनगर परिसरातील ऐतिहासिक वास्तू, कागदपत्रे दुर्मिळ वस्तूंचा संग्रह पाहत होतो. आमचे स्नेही प्रसिद्ध इतिहाससंशोधक व अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा आधारस्तंभ असलेले श्री. सुरेशराव जोशी यांच्या सत्संगात वेळ मजेत जात होता.

व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी सकाळी सुरेशराव अचानक मला म्हणाले, ‘विजयराव मी तुम्हाला एक अद्भुत गोष्ट दाखवणार आहे.’ माझी उत्सुकता शिगेला पोचली. सुरेशरावांसोबत मी ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात गेलो. सुरेशरावांनी मला एका खुर्चीवर बसवले. टेबलावर एक दुर्बीण ठेवली आणि म्हणाले, ‘विजयराव, अवघे प्राण डोळ्यात आणून हे चित्र पाहा.’ आणि हळूच जुन्या दौलताबादी कागदावर रेखाटलेले १७ व्या शतकातील काळ्या रंगात चितारलेले एक अस्सल ऐतिहासिक चित्र दुर्बिणीखाली सुरेशरावांनी सरकवले.

अरे बापरे! हे चित्र होते छत्रपती शंभूराजांचे. ३२ वर्षे वयाचा हा शेर शिवाचा छावा. आसन नसलेल्या उंटावर बसलेला. दोन्ही हात आणि मान लाकडी जोखडात करकचून आवळलेली. डोक्यावर इराणमध्ये घालतात तशी विदुषकी टोपी घातलेली. उंटाच्या हाडांच्या टेकड्यांवर आधारहीन आसनविरहित स्थितीत बसलेले शंभूराजे भेलकांडत धावणाऱ्या उंटावरून पडू नयेत म्हणून मागून एका औरंगजेबी सरदाराने शंभूराजांची कंबर घट्ट धरून ठेवलेली. उंटाला खेटून चालणारे शिपाई भाल्याच्या फाळाने शंभूराजांना टोचताहेत. झाडावरील शिपाई शंभूराजांवर दगड भिरकावीत आहेत. ढोल, ताशे, कर्ण्यांच्या कर्कश आवाजात बहादूरगडावर शंभूराजांची धिंड काढली जात आहे…. होय दगाबाजीने कैद झालेल्या शंभूराजांची बहादूरगडावर त्यांना औरंगजेबासमोर पेश करण्यापूर्वी उंटावरून जी भेसूर धिंड काढण्यात आली होती तिचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या मुघल सैन्यातील एका चित्रकाराने रेखाटलेले हे अस्सल चित्र होते. चित्राच्या खाली दखनी उर्दू भाषेत लिहिलेले होते, ‘काफर संभा!’

चित्राकडे पाहवत नव्हते. शरीर कंपायमान होऊ लागले. हुंदका फुटला. पूर्णतः गलबलून गेलो होतो. सुरेशराव पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, ‘विजयराव, भावना आवरा. संशोधकाच्या तटस्थ वृत्तीने अशाही अवस्थेत जखडल्या गेलेल्या शंभूराजांच्या नेत्रांकडे स्थिर दृष्टीने पाहा.. पाहा.’ दुर्बिणीतून मी शंभूराजांच्या नेत्रांवर दृष्टी स्थिर केली आणि खरंच मनोवृत्ती बदलल्या. जखडलेल्या, मृत्यू समोर दिसत असलेल्या मनःस्थितीतही शंभूराजांच्या नेत्रांमधून अंगार फुललेले होते. देव-देश-धर्मासाठी बलिदान करण्याचा निर्धार नेत्रांमधून ओसंडत होता. डोळ्यांमधून बाहेर पडणाऱ्या ठिणग्या औरंगजेबी सत्तेला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत, याची ग्वाही देत होत्या. महान पराक्रमी, निर्भयी, महातेजस्वी शंभूराजे नेत्रांद्वारे प्रकट होत होते.

आवेगानेच सुरेशरावांचे हात धरले. डोळे पुसले. कुठलीतरी विलक्षण शक्ती संचारली होती. त्याच अवस्थेत म्हणालो, ‘सुरेशराव पुढचे सहा महिने व्याख्याने बंद! आता फक्त शंभूराजांच्या कागदपत्रांचा रात्रंदिन अभ्यास करीन. २५ वर्षांचा तरणाबांड शंभूराजा ६४ वर्षे वयाच्या आशिया खंडातील सर्वश्रेष्ठ मुरब्बी सम्राटाला कसा दंड थोपटून ९ वर्षे महाराष्ट्रातच खिळवून ठेवतो हे महाराष्ट्राला सांगेन!’

निर्धार व्यक्त करून नागपूरला परतलो. सहा महिने रात्रंदिवस कागदपत्रांच्या गराड्यात स्वतःला कोंडून घेतले. केवढे आश्‍चर्य! उत्तरकालीन बखरकारांनी रंगविलेला रंगेल, बाहेरख्याली, मद्यपी, अदूरदर्शी शंभूराजा अस्सल कागदपत्रांच्या प्रकाशात कुठेच दिसत नव्हता! शत्रूगोटातील अस्सल फारसी कागदपत्रांमधून व्यक्त होत होता फक्त आणि फक्त शत्रूला सळो की पळो करून सोडणारा, शत्रूच्या अंतःकरणात धडकी भरवून त्याचा थरकाप उडवून देणारा शेर शिवाचा तेवढाच शेर छावा!

शंभूराजांची उजळलेली प्रतिमा सिद्ध झाली. आता ती महाराष्ट्राला कशी दाखवायची, कशी मांडायची? व्यासपीठ मिळवायला हवे. श्रीसद्गुरूंची आज्ञा अशी, की ‘कुठेही आपणहून विनंती करायची नाही. शंभूराजांचे कार्य तेच कुणाकरवी करून घेतील. तोवर स्वस्थ राहा!’

आणि महाराजांच्या कृपेने अघटित घडले, त्या वेळचे पुण्याचे कर्तबगार उपमहापौर सुरेशराव नाशिककर नागपूरला घरी आले. त्यांनी शंभूराजांवरील त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे निमंत्रण दिले. पुण्याच्या पेठेतील नूतन मराठी विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेली ती अविस्मरणीय व्याख्यानमाला! पुणेकर भारावून गेले. शेवटच्या दिवशीचा शंभूराजांच्या अखेरीचा हृदयद्रावक प्रसंग ऐकून श्रोतावर्ग सुन्न झाला होता. पुण्यापासून जेमतेम २७ किलोमीटरवर ३०० वर्षांपूर्वी हा भीषण प्रसंग घडला होता. पण आज तो आपल्या विस्मरणात गेला होता, हा अपराधीपणाचा भाव प्रत्येक श्रोत्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. व्याख्यान संपले तरी कुणीच जागेवरून उठला नव्हता! पुढे आठ दिवस एक तरुण ज्या वेळी नूमविसमोरून जाई, त्या प्रत्येक वेळी त्या प्रांगणाला नमस्कार करून पुढे जाई! कदाचित आजही ती व्याख्यानमाला उपस्थित श्रोत्यांच्या स्मरणात असेल!

शिवदुर्गदर्शन यात्रेमध्ये सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी शंभूराजेंचे खरे दर्शन घडविणारे चरित्र सर्वसामान्य लोकांना समजू शकेल, अशा भाषेत लिहावे, अशी सूचना केली. त्यांची ही आज्ञा शिरसावंद्य मानून सहा महिन्यांत केवळ शंभूचरित्राचा ध्यास घेत विजयराव देशमुख यांनी लिहिलेले शंभूराजेंचं चरित्र म्हणजेच राजा शंभू छत्रपती. या ग्रंथाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. जेमतेम ६ महिन्यांत तब्बल ११ हजार प्रती संपल्या. छत्रपती संभाजी महाराजांची खरी प्रतिमा समाजापुढे आणली आणि त्यांच्याविषयी आदर, भक्ती, श्रद्धा जनमानसात दृढ झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे, त्यांच्या कर्तृत्वाचे सच्चे दर्शन घडविणारा हा ग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा.

प्राप्तिस्थळ:

पुणे: छत्रपती सेवा प्रतिष्ठान कार्यालय, मनोरमा, २ रा मजला, १०८८, बाजीराव रस्ता, जनता बँकेसमोर, शनिपार चौकाजवळ, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
संपर्क: मंगेश बरबडे, मो. ९९२१२३७९९९

नागपूर: छत्रपती सेवा प्रतिष्ठान कार्यालय, जयप्रकाश नगर, नागपूर. संपर्क: प्रसन्न बारलिंगे, मो. ९७६४५३५३२५