छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

शककर्ते शिवराय

शिवचरित्रलेखन हे राष्ट्रीय कार्य आहे अशीच इतरांप्रमाणे आमचीही नम्र भावना आहे. फक्त राष्ट्रीय कार्य म्हणजे काय, याविषयी बव्हंशी सर्वत्र वैचारिक गोंधळ उडालेला दिसतो. म्हणूनच आमची या शिवचरित्रलेखन कार्यामागील भूमिका विशद करणे अगत्याचे वाटते.

शिवचरित्र हा भारताच्या इतिहासाचाच एक अंश आहे. दुर्दैवाने भारताला जो इतिहास आहे असे समजले जाते, तो पराभवांचाच इतिहास आहे. तो तसा असणेही स्वाभाविकच आहे. कारण इतिहासाचा सांगाडा रचण्यासाठी जी साधने उपलब्ध आहेत ती बव्हंशी परकीयांनी लिहून ठेवलेली आहेत !  ही मंडळी आक्रमकांबरोबरच भारतात आली. स्वाभाविकच त्यांच्या आक्रमणाचे औचित्य सांगणे हाच या मंडळींचा नकळत हेतू होऊन बसला. या मंडळींना हिंदुस्थानाबद्दल, इथल्या प्रजेबद्दल आस्था, सहानुभूती असण्याचे कारणच नव्हते. त्यामुळे त्यांच्या लेखनात परकीयांच्या विजयाच्या नोंदीच तेवढ्या प्रामुख्याने आढळतात. या आधारावर रचला गेलेला इतिहास भारताचा म्हणून सांगितला गेला. त्यामुळेच हा इतिहास निर्जीव वाटतो. भारताचे राष्ट्रीय मन त्यात दृग्गोचर झालेले आढळत नाही. या इतिहासाच्या परिशीलनाने आमची दृष्टी निर्जीव झाली. कर्तृत्व दिशाहीन होऊ लागले. एवढेच नव्हे तर, आकलनातही वैचारिक गोंधळ उत्पन्न होऊ लागला.

या पार्श्वभूमीवर शिवचरित्रलेखनाच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकणे मोलाचे ठरावे. महाराजांच्या लोकविलक्षण कर्तृत्वामुळे समकालीन एतद्देशीय लोक त्यांच्याकडे ‘अवतार’ या दृष्टीने पाहत होते. या अवतारकल्पनेमुळे मध्ययुगीन काळात, पूर्वपरंपरेचे सूत्र लक्षात घेता, महाराजांची चरित्रे पौराणिक आख्यान स्वरूपाची होणे स्वाभाविकच होते. बखरींचा थाट त्यामुळेच तसा दिसतो. हिंदवी स्वराज्याच्या निर्मात्याबद्दल निरतिशय भक्तिभाव हाच या लेखनाचा मूलाधार होता. पेशवाईच्या काळात शिवचरित्र विशद करणाऱ्या बखरींकडे आदराने पाहिले जाई. त्यामुळे या काळात अशी बखर-चरित्रे बहुसंख्येत उत्पन्न झाली. जनमानसात महाराजांना जे पूजनीय स्थान प्राप्त झाले होते, त्याचेच यथार्थ प्रतिबिंब या शिवचरित्रांमध्ये दृष्टीस पडते.

इ.स. १८१८ मध्ये पेशवाई अस्तास जाऊन अव्वल इंग्रजी काळ सुरू झाला. गुलामगिरीमुळे एक हीनगंड सर्वदूर उत्पन्न झाला. शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन बंद पडले. या काळात इंग्रजांनी विजेत्याच्या भूमिकेतून औत्सुक्य म्हणून भारताचा गतेतिहास ‘शोधायला’ सुरुवात केली. शिवचरित्रही याच भूमिकेतून ‘शोधले’ जाऊ लागले. ग्रँट डफचा ‘मराठ्यांचा इतिहास’ हे त्याचेच फळ. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे, आक्रमकांच्या राजवटीचे औचित्य सांगणे हाच हेतू ग्रँट डफचा होता. स्वाभाविकच ग्रँट डफचे शिवचरित्र एतद्देशीयांच्या दृष्टीने निर्जीव, तर इंग्रजांच्या दृष्टीने औचित्यपूर्ण ठरले! यासारख्या ‘इतिहास-अध्ययनामुळे’, ‘शिवाजी महाराज वसूल करीत ती लूट व वेलेस्ली वसूल करी ते नजराणे’ अशी शिकवण भारतीय मनाला मिळू लागली. महाराजांच्या चरित्रावरून महाराज म्हणजे Great Rebel आणि Great Disturber समजले जाऊ लागले.

इ.स. १८५७ नंतर या परिस्थितीत पुन्हा एकदा फरक पडू लागला. काही क्रांतदर्शी मनांना शिवचरित्र स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी उपयोगी पडू शकेल, असे जाणवू लागले. लवकरच लोकमान्य टिळकांसारखा अलौकिक नेता भारताला लाभला. असंतोषाच्या या जनकाचे इंग्रजी तृणाखाली झाकल्या गेलेल्या व राखाळत चाललेल्या शिवचरित्राच्या निखाऱ्याकडे लक्ष न जाते तरच नवल! शिवचरित्राचे  मोल जाणून या द्रष्ट्या पुरुषाने हळूच फुंकर घातली आणि पाहता पाहता स्वराज्यसंस्थापनार्थ चळवळीचा वन्ही पेटू लागला. शिवस्मृतीच्या पथावरच स्वराज्याची चळवळ वाटचाल करू लागली. जेम्स डग्लसने इ.स. १८८३ मध्ये ‘बुक ऑफ बॉम्बे’ हे पुस्तक लिहून रायगडावरील महाराजांच्या समाधीच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. हे करण्यात त्याचा उद्देश वरकरणी पवित्र भासत असला तरी, मुळात एतद्देशीयांना हीन लेखण्याचाच होता. पण लो. टिळकांनी या घटनेचा अपूर्व लाभ करून घेतला आणि पाहता पाहता प्रथम महाराष्ट्र आणि मग संपूर्ण भारत शिवछत्रपतींच्या गगनभेदी जयजयकाराने व्यापून गेला. टिळकांची स्वराज्यकल्पना शिवचरित्राच्या कोंदणात शोभू लागली. शिवचरित्र पुन्हा आमचे अभिमान-स्थान झाले.

या पार्श्वभूमीवर देशाभिमानी विद्वानांनी ग्रँट डफच्या लेखनाचे पुनर्निरीक्षण केले. एकीकडे लो. टिळकांच्या प्रेरणेने शिवजयंत्युत्सव गाजू लागले तर, दुसरीकडे बखरीचे संशोधन आणि त्यांच्या आधारे ग्रँट डफच्या लेखनाची विफलता सिद्ध करून दाखविली जाऊ लागली. श्री. कीर्तने हे या संदर्भात अध्वर्यू ठरले. नवसंशोधित बखरीच्या आधारे पुन्हा बोधप्रद शिवचरित्रे लिहिली जाऊ लागली. श्री. कृ. अ. केळुसकरांचे शिवचरित्र याच टप्प्यावरचे आहे. इ.स. १९०० च्या आसपास भावोत्तेजक स्वातंत्र्यचळवळीला डोळसपणा आला होता. इंग्रजी बुद्धीनेच इंग्रजी काटा काढावा, हा विचार सर्वत्र रूढ होऊ लागला. याच वृत्तीचे प्रतिबिंब शिवचरित्रलेखनातही पडू लागले. निव्वळ बखरीवर विसंबून न राहता, पाश्चात्त्य कल्पनेप्रमाणे ‘अस्सल’ शिवचरित्र निर्माण झाले पाहिजे व त्यासाठी विश्वसनीय साधनांचे, कागदपत्रांचे संशोधन केले पाहिजे, हा विचार प्रभावी ठरला. शिवचरित्राच्या अधिष्ठानाचाही गंभीरपणे विचार होऊ लागला. परिणामस्वरूप या काळात एकीकडे कै. राजवाड्यांचे प्रचंड संशोधनकार्य सुरू झालेले दिसते तसेच, दुसरीकडे कै. रानड्यांच्या ‘राइज ऑफ दि मराठा पॉवर’ या इंग्रजी ग्रंथाच्या माध्यमातून शिवचरित्राचे अधिष्ठान शोधण्याचा प्रयत्न दृष्टोत्पत्तीस पडतो.

या काळात अनेक संशोधकांनी अथक प्रयत्न करून हजारो कागदपत्रे गोळा केली. या नवसंशोधित विश्वसनीय कागदपत्रांच्या प्रकाशात बखरींची छाननी केली जाऊ लागली व आपले निष्कर्ष मांडण्यासाठी या अभ्यासकांनी पुन्हा शिवचरित्राची नव्याने मांडणी सुरू केली. रियासतकार सरदेसाई, सर यदुनाथ सरकार, श्री. चिं. वि. वैद्य, डॉ. बाळकृष्ण, श्री. द. वि. आपटे इत्यादी इतिहास संशोधक-अभ्यासकांनी लिहिलेली शिवचरित्रे (किंवा निबंधावल्या) याच काळातील (१९००-१९३२) आहेत.

दरम्यान, स्वराज्य चळवळीला महात्मा गांधींचे नवे नेतृत्व लाभले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रश्न नव्याने समोर आला. इंग्रजांची ‘फोडा-झोडा’ नीती यशस्वी ठरली. या बदलत्या परिस्थितीत शिवचरित्राला पुन्हा ‘मंदीचे’ दिवस आले. संशोधनकार्याचा जोरदार प्रवाह हळूहळू क्षीण होऊ लागला. औदासीन्यामुळे नवी शिवचरित्रनिर्मिती जवळ जवळ थांबली. श्री. वा. कृ. भाव्यांच्या ‘युगप्रवर्तक श्री. शिवाजी महाराज’ या शिवचरित्राचा अपवाद वगळता सर्वदूर शुकशुकाटच दिसू लागला.

यानंतर भारत स्वतंत्र झाला. लोकशाही राष्ट्र म्हणून स्वतंत्र भारताचा कारभार सुरू झाला. या काळात ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ उभारली गेली. याच सुमारास १८५७ ची शताब्दी साजरी झाली. त्यामुळे व संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने पुन्हा शिव-स्मरणाला उजाळा मिळाला. शिवचरित्राच्या अभ्यासाकडे महाराष्ट्रातील जनता आदराने पाहू लागली. स्वाभाविकच संशोधक, अभ्यासक, लेखकांची शिवचरित्रलेखनाकडे पुन्हा प्रवृत्ती होऊन लागली. फलस्वरूप श्री. ब. मो. पुरंदरे, श्री. बाळशास्त्री हरदास, श्री. दि. वि. काळे, श्री. त्र्यं. शं. शेजवलकर प्रभृतींची शिवचरित्रे सिद्ध झाली.

महाराष्ट्र राज्य झाले. शिवचरित्राला ‘राजप्रतिष्ठा’ प्राप्त झाली. महाराजांची मुद्रा किंचित बदल करून महाराष्ट्र सरकारने स्वीकारली. सरकारी प्रोत्साहन शिवचरित्रलेखनार्थ मिळू लागले. कै. म.म. दत्तो वामन पोतदार, श्री. वा. सि. बेंद्रे यांच्यासारख्या संशोधन महर्षींना राजसत्तेचा पाठिंबा, प्रोत्साहन मिळाले. श्री. बेंद्रेंचे शिवचरित्र महाराष्ट्रासमोर आले. दुर्दैवाने म.म. पोतदारांच्या बाबतीत तसे घडू शकले नाही.

महाराष्ट्रातील शिवचरित्रलेखनाचे हे टप्पे पाहिले. आता उर्वरित भारताकडे या संदर्भात दृष्टी वळवली असता काय दिसते ते थोडक्यात पाहू.

बंगालमध्ये शिवछत्रपतींच्या चरित्राकडे इ.स. १९०२ पासून विशेष अभ्यासपूर्वक पाहिले जाऊ लागले. लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीची योजना जाहीर करताच बंगाल पेटला. देशभक्तीची प्रखर ज्योत तिथे तेजाने तळपू लागली. याच काळात शिवाजी उत्सव तिथे सुरू झाले. बिपिनचंद्र पाल, योगी अरविंद व रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या महान देशभक्तांनी शिवचरित्राचे गायन वेगवेगळ्या माध्यमांतून केले.

तत्पूर्वी बंगालला शिवाजी महाराज परिचित नव्हते असे मात्र नाही. इ.स. १८५७  साली भूदेव मुखोपाध्याय यांच्या ‘ओंगुरीया बिनिमोय’ कादंबरीत रोशनारा बेगम महाराजांच्या प्रेमात पडते असे दाखविले आहे! याउलट इ.स. १८८० साली लिहिलेल्या नवीनचंद सेनच्या ‘रंगमती’मध्ये बीरेंद्र हा क्रांतिकारक नायक रंगविला असून त्याने आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून शिवाजी महाराज दाखविलेले आहेत! महाराज बीरेंद्रला संदेश देतात की, ‘गुलामगिरीपेक्षा लुटी व दरोडे केव्हाही श्रेष्ठ!’ म्हणजे बंगालमध्ये प्रथम शृंगार-नायक, नंतर क्रांतिकारकांचे मार्गदर्शक म्हणून व नंतर राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक म्हणून ‘महाराजांचे व्यक्तिमत्त्व’ विकसित झालेले दिसते.

इ.स. १८८९ मध्ये ‘शिवराजभूषण’ हे कवी भूषणाचे काव्य प्रथम प्रकाशित झाले. शिवचरित्राची ओळख उत्तर भारतात खऱ्या अर्थी ‘शिवराजभूषण’ काव्याने करून दिली! या काळाच्या माध्यमातून शिवचरित्रामुळे प्रभावित झालेल्या पं. राधाकृष्ण मिश्र या सुप्रसिद्ध कवीने १९०४ मध्ये ‘महाराष्ट्र भूमीकी वंदना’ हे काव्य रचले. पाठोपाठ इ.स. १९०९ मध्ये त्यांनीच ‘छत्रपतीकी प्रशस्ती’ रचून ‘हिंदुधर्मरक्षक’ शिवरायांचे दर्शन उत्तरप्रदेशाला घडविले. इ.स.१९१४ मध्ये लाहोर येथील हरि कृष्ण प्रेमी यांनी ‘शिव-साधना’ नाटक लिहून महाराज संपूर्ण हिंदुस्थानाचे होते, संपूर्ण हिंदुस्थानात त्यांना लोक-राज्य स्थापायचे होते व ते मुस्लिमद्वेष्टे नव्हते, या गोष्टी प्रामुख्याने जनतेसमोर ठेवल्या.

महाराजांचे उर्दू चरित्र इ.स. १८९६ मध्ये लाला लजपतराय यांनी लिहिले. त्यात स्वातंत्र्यार्थ लढणारा झुंजार योद्धा या स्वरूपात शिव-दर्शन घडविले आहे. पंजाबात आर्य समाज चळवळीवरही महाराजांच्या चरित्राचा प्रभाव पडलेला दिसतो. प्रामुख्याने पं. श्रीराम शर्मांनी आर्य समाजाच्या ध्येयधोरणांवरील महाराजांचा प्रभाव विशद केला. स्वामी दयानंदही महाराजांच्या चरित्रामुळे प्रभावित झालेले होते. आसामातही शिवचरित्राचा प्रभाव बराच पडला. अतुल चंद्र हजारिका यांचे ‘छत्रपती शिवाजी’ (१९२६) नाटक बालपणापासून राज्यारोहणापर्यंतचे शिवचरित्र नमूद करणारे आहे. एक राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व म्हणून महाराजांचे व्यक्तिचित्रण त्यात केलेले आढळते. शिवाजी उत्सव बनारस, कलकत्ता, कराची व मद्रास इथे साजरा होई. या उत्सवांनी महाराजांकडे राष्ट्रपुरुष या नात्याने पाहण्याची थोडीफार दृष्टी भारतीयांना निश्चितच दिली.

पण असे असले तरी, ‘राष्ट्रपुरुष’ या नात्याने शिवछत्रपतींचे यथार्थ दर्शन घडविणारे चरित्र अजून निर्माण झालेले नाही, अशी खंत सर्वत्र व्यक्त केली जाते. विशिष्ट संदर्भात, विशिष्ट काळात जसे आवश्यक वाटले तसे शिवचरित्र आजवर सांगितले गेले. यातून तात्कालिक गरजेची पूर्ती झालीही असेल; पण त्याचबरोबर, तेच खरे शिवचरित्र हा आग्रहही कायम झाला! अशी चरित्रे स्थायी स्वरूपाचे मार्गदर्शन करण्यास असमर्थ ठरल्यास नवल नाही.

विश्वसनीय साधनांच्या आधारे यथार्थ विश्लेषण करून राष्ट्रचिंतनाच्या संदर्भात गवसलेले, सत्य शिवचरित्र निर्लेप मनाने व निःस्पृहपणे सांगितले गेले तरच ते मार्गदर्शक ठरू शकेल. अर्थात, ज्याचा जेवढा आवाका तेवढ्या प्रमाणातच असा प्रयत्न यशस्वी होईल. याच भूमिकेतून आम्ही हा खटाटोप मांडला आहे. तो एक टक्का जरी यशस्वी झाला तरी आम्हाला धन्यता वाटेल.

या खंडातील बरीच माहिती अभ्यासक-वाचकांना बहुधा नवे खाद्य पुरवणारी ठरावी. या संदर्भात (१) शिवपूर्वकालीन भारताचे विवेचन, (२) संत-आचार्य कार्यक्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानदेव ते समर्थ कार्याचे विवेचन, (३) लखूजी जाधवांच्या कर्तृत्वाचे विवेचन, (४) जिजामाता जन्मतिथी, (५) जाधव-भोसले संबंधांचे विवेचन, (६) खंडागळे हत्ती प्रकरण, (७) मालोजीराजांच्या दोन स्त्रियांसंबंधी चर्चा, (८) शिवजयंती निर्णयार्थ राज्याभिषेक कुंडली व बजरंग भाटाच्या कवनाचे दोन स्वतंत्र पुरावे, (९) समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे नवे आकलन, (१०) शिव-समर्थांची पहिली भेट केव्हा झाली यासंबंधी चर्चा, (११) पावनखिंड प्रकरण इत्यादी प्रकरणांकडे अंगुलीनिर्देश करता येईल. या प्रतिपादनातील प्रमेये नम्रपणे अभ्यासकांसमोर ठेवली आहोत. इतिहासलेखनात अभिनिवेशाला स्थान नसतेच. असो.

शिवचरित्राचा हा खंड सिद्ध करण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. ग. ह. खरे यांची बहुमोल मदत झाली. कै. म.म. पोतदारांचेही आस्थापूर्वक लक्ष इकडे होते. श्री. प्रताप गोगावले या शिवभक्ताचे सहकार्य नोंदवतो म्हटले तर बरीच पाने खर्ची पडतील! श्री. मुकुंद पेशकार यांनी अल्पावधीतच स्थल-नाम सूचीचे काहीसे कष्टदायक कार्य आनंदाने करून दिले. श्री. प्र. द. वांभोरीकरांनी आवश्यककुंडल्या करून दिल्या. अर्थात ही नामावली परिपूर्ण नाही.

छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या सर्व विश्वस्तांचे तसेच आमच्या असंख्य हितचिंतकांचे पाठबळ या लेखनामागे उभे आहे. त्या सर्वांचा नामनिर्देश या ठिकाणी शक्य नसला तरी त्यांच्या प्रेमाची शिदोरी सोबत नसती तर ही वाटचाल शक्य झाली नसती, याची नम्र जाणीव सदैव जोपासून ठेवलेली आहे.

shakkarte shivray-marathi edition

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवभक्तांना अनमोल भेट

'शककर्ते शिवराय' ची शिवआवृत्ती फक्त ५०० रुपयांत

तेजस्वी शिवयोगी श्री विजयराव देशमुख यांनी अनेक वर्षे केलेले अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधनांचा, दस्तऐवजांचा चिकित्सक अभ्यास यांतून `शककर्ते शिवराय` हे शिवचरित्र सिद्ध झाले आहे. अस्सल पुराव्यांचा आधार, रसाळ आणि ओघवती भाषाशैली ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये होत. शककर्ते शिवराय हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात मान्य झाला आहे. पिढ्यान् पिढ्या जतन करून ठेवावे आणि प्रत्येक शिवप्रेमीने नियमित वाचन, मनन आणि चिंतन करावे असे १२०० पृष्ठांचे २ खंड असलेले हे प्रासादिक शिवचरित्र केवळ ५०० रुपयांत ‘ना नफा’ तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवरायांचे तेजस्वी चरित्र घराघरात पोचावे यासाठी या ‘शिव आवृत्ती’ साठी लेखक, प्रकाशन आणि विक्रेते शून्य रुपये मानधन-नफा आकारत आहेत. ही सवलत पुढील वर्षीच्या शिवराज्याभिषेक दिनापर्यंतच उपलब्ध आहे त्यामुळे आजच आपली प्रत घेऊन जा. ५०० रुपये मूल्य असलेल्या या शिवआवृत्ती सोबत, १८०० रुपये मूल्य असलेली ‘शककर्ते शिवराय’ ची ‘प्रीमिअम क्वालिटी’ प्रत भरघोस सवलतीच्या दरात अर्थात  केवळ ८०० रुपयांत उपलब्ध आहे.     

प्राप्तिस्थळ:

पुणे: छत्रपती सेवा प्रतिष्ठान कार्यालय, मनोरमा, २ रा मजला, १०८८, बाजीराव रस्ता, जनता बँकेसमोर, शनिपार चौकाजवळ,
सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. संपर्क: मंगेश बरबडे, मो. ९९२१२३७९९९ 

नागपूर: छत्रपती सेवा प्रतिष्ठान कार्यालय, जयप्रकाश नगर, नागपूर. संपर्क: प्रसन्न बारलिंगे, मो. ९७६४५३५३२५  

शककर्ते शिवराय ची शिवआवृत्ती आणि प्रतिष्ठान ने प्रकाशित केलेले इतर ग्रंथ आपण घरपोच सुद्धा मागवू शकता.