प्रेरणास्थान
छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांचे आजवरचे जीवन म्हणजे शिवकार्य आणि भक्तीमार्ग यांचा अद्भूत संगम होय. एका सामान्य, शेतकरी कुटुंबात आणि गाडेगाव सारख्या लहान खेड्यात जन्मलेल्या विजयरावांनी अवघ्या १९ व्या वर्षापासून शिवकार्य आरंभले.
आपल्या ओजस्वी, रसाळ शैलीतून त्यांनी आजवर दहा हजारांहून अधिक शिवचरित्र व्याख्याने संपूर्ण देशभरात दिली आहेत. ही व्याख्याने सुमारे ६ लाख शिवभक्तांनी प्रत्यक्ष ऐकली आहेत.
सतत १८ वर्षे त्यांनी शिवदुर्ग दर्शन यात्रेचे आयोजन करुन हजारो शिवभक्तांना दुर्गभ्रमंती घडविली.
अविरत संशोधन करुन त्यांनी साकारलेले `शककर्ते शिवराय` हे शिवछत्रपतींचे द्विखंडात्मक चरित्रग्रंथ सर्वाधिक विश्वासार्ह शिवचरित्र म्हणून ओळखले जाते. सगळ्याच इतिहास संशोधकांनी सत्यकथन करणारे प्रमाणित शिवचरित्र असा या ग्रंथाचा गौरव केला आहे. १९८० मध्ये शिवरायांच्या त्रिशताब्दी पुण्यतिथीला शककर्ते शिवराय हा ग्रंथ छत्रपती शिवरायांच्या समाधीवर अर्पण करण्यात आला. चांदीच्या पालखीत शिवरायांसमवेत या ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. असे भाग्य लाभलेला आजवरच्या इतिहासातील हा एकमेव ग्रंथ. आज महाराष्ट्रातील लाखो घरांमध्ये हा ग्रंथ अभिमानाने ठेवण्यात येतो, त्याचे भक्तीभावाने वाचन होते, शिवरायांच्या अस्तित्वाची अनोखी अनुभूती घेतली जाते.
शिवरायांच्या प्रेरणेचा स्पर्श झालेल्या शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांनी आपली लेखणी, वाणी यातून अविरत शिवकार्य तर केलेच शिवाय त्यांच्यातील संशोधकवृत्तीने प्रचलित ऐतिहासिक लेखनव्यवहारास वेगळी दिशाही दिली. छत्रपती शिवरायांची जन्मतिथी निश्चित होण्यामागे त्यांचेच अविरत संशोधन कामी आले. त्यामुळेच शिवजयंतीचा वाद संपुष्टात येऊ शकला. तत्पूर्वी, ८० च्या दशकात जिजाऊ मासाहेबांच्या जन्मतिथीचा बोध त्यांना एका पोवाड्यातून झाला आणि जिजाऊसाहेबांची जयंती उत्साहात साजरी होऊ लागली. सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थान कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिले होते. १९८२ मध्ये छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवकथाकार श्री. विजयराव देशमुखांच्या प्रेरणेतून भव्य जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. त्यासाठी संपूर्ण मराठी मुलुख पालथा घालून त्यांनी हजारो लोकांना या कार्यास जोडले आणि न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक सोहळा घडविला. जिजामाता जन्मोत्सव हा लोकोत्सव ठरावा, यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सर्वशक्तीनिशी अविश्रांत काम केले आणि तेव्हाच्या काळातील सर्वात भव्य-दिव्य, देखणा असा महासोहळा सिंदखेडराजा येथे आयोजित झाला. या उत्सवात तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुलेही सहभागी झाले. देशभरातील मान्यवरांनी त्यासाठी शुभसंदेश पाठविले. धर्माचार्यांनी आशीर्वाद धाडले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंदखेडवासीयांना एक अवर्णनीय सोहळ्याचे साक्षीदार बनता आले.
राजाभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विद्वानांचे पूजन केले. हीच परंपरा कायम ठेवत श्री शिवराजाभिषेकाची स्मृती कायम राहावी, यासाठी इतिहास, धर्म आणि संस्कृती या क्षेत्रांत व्रतस्थपणे कार्य करणाऱ्या विद्वानांचा गौरव करण्याचा विचार त्यांनी मांडला आणि त्यातूनच जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार सुरु झाला. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. पुरस्कार प्रदान करुन विद्वत पूजनाचे व्रत गेली ४२ वर्षे हे अखंड सुरु आहे.
मराठ्यांच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारख्या थोर पराक्रमी योद्ध्याला इतिहासलेखनातून न्याय दिला जात नाही, यासाठी खरे शंभूराजे लोकांसमोर आणण्यासाठी तुम्ही पुढे या, असे आवाहान राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी शिवकथाकार श्री. विजयराव देशमुखांना केले. त्यांची आज्ञा प्रमाण मानून शंभूराजांवरील व्याख्यानमाला सुरु केल्या. त्यास उभ्या महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद लाभू लागला. शंभूराजेंविषयीचा अपप्रचार उघडा पाडून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, पराक्रमाचे अस्सल दर्शन घडविणारे पुस्तक `राजा शंभू छत्रपती` प्रकाशित झाले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावे, यासाठी विशेष योजना राबविण्यात आल्या. विजयराव देशमुखांनी शंभूराजेंविषयीच्या आक्षेपांना पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत कागदपत्रांचे संदर्भ देत, पुराव्यांसह खोडून काढले. या पुस्तकामुळे प्रचंड जनजागृती झाली. शंभूराजेंविषयी आदराची, भक्तीची लाट निर्माण झाली.
५ एप्रिल १९८९ रोजी धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांचा ३०० वा बलिदानदिनाचा कार्यक्रम वडू कोरेगाव येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी, विजयरावांच्या नेतृत्वाखाली शंभूराजांच्या जन्मस्थळापासून समाधीस्थळापर्यंतच्या स्थळांना भेट देत त्यांना अभिवादन करणारी यात्रा निघाली. ही यात्रा महाराष्ट्रातील हजारो शिवभक्तांसह वडू कोरेगावला येऊन शंभूराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झाली. खरे शंभूराजे लोकांपुढे उभे करण्याचा संकल्प अशा रितीने लाखो लोकांच्या साक्षीने पूर्ण झाला. शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांची विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विलक्षण प्रतिभेची साक्ष देते. शककर्ते शिवराय, राजा शंभू छत्रपती यांचप्रमाणे, सूर्यपूत्र कर्ण, मऱ्हाटी माती, कथांगण, सिंहासनाधीश्वर, क्षत्रियकुलावतंस, महाराजांच्या मुलखात, समर्थस्मरण, सहज बोलणे हितोपदेश, किर्तन कौस्तुभ, प्रवचन परिमल अशा विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी लक्षावधी वाचकांच्या मनावर आपला अमीट ठसा उमटविला आहे.
शिवकार्यास वेग आल्यानंतर शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांनी आपले गुरु प.पू. विष्णूदास स्वामी महाराज यांच्या आदेशानुसार, अध्यात्मक्षेत्रात आपले कार्य आरंभले. गुरुआज्ञेने सद्गुरुदास नाममुद्रा अंगिकारुन त्यांनी धर्म आणि अध्यात्मकार्यात लक्षावधी साधकांना जोडले. गुरुमंदिर परिवार म्हणून त्यांचा शिष्यवर्ग महाराष्ट्र व देशभरातच नव्हे तर युरोप-अमेरिकेसह अनेक देशांमध्ये भक्तीमार्गावर चालतो आहे.
देशविदेशात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४५०च्या वर उपासना केंद्रे कार्यरत असून पत्रभेट या गुरुमंदिर परिवाराच्या मुखपत्राच्या माध्यमातून महाराज आपल्या साधकांना मार्गदर्शन करतात. अत्यंत सोप्या, साध्या शब्दांत धर्म, जीवन आणि अध्यात्म यांवर साधकांशी संवाद साधणे, अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील अद्वैत पुढं आणणं, भारतीय संस्कृतीत लपलेल्या विलक्षणाचे दर्शन आपल्या शब्दांतून आणि लेखणीतून घडविणे आणि हे सारं करीत असताना व्यक्तीचे मन, मेंदू आणि मनगट यांच्या विकासातूनच खरी राष्ट्रनिर्मिती होऊ शकते, या प्रेरणेची पेरणी सद्गुरुदास महाराज अव्याहतपणे करीत असतात.
प. पू. सद्गुरुदास महाराजांच्या आजवरच्या धर्म आणि राष्ट्रकार्याची दखल घेत ११ जानेवारी २०२३ रोजी त्यांना संकेश्वर पीठाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते “धर्मभास्कर” हा धर्मक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले.